LatestUpdate : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 : पहिल्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना 16 हजार 906 मतांची आघाडी, पदवीधरांची साडेपाच हजार मते झाली बाद !!

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या मोजण्याची पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळाली आहेत . पहिल्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांनी 16 हजार 906 मतांची आघाडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या दोन लाख 40 हजार 796 मतदान पैकी 56 हजार मतांच्या मोजणी ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पदवीधर मतदारांची ५५०० मते बाद झाली आहेत .
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला हळू हळू गती येत असून पोस्टल मतांच्या मोजणीत 1248 मतदारांपैकी 175 मते अवैध ठरली आहेत. यापैकी आता 1073 मतांची मोजणी सुरू आहे अद्याप कुठलाही कोटा ठरविण्यात आलेला नाही. मतमोजणीच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर त्यातील वैध मतांची बेरीज करून त्याला दोन ने भागून त्यात एक मिळवून जी संख्या येईल तो विजयाचा कोटा ठरविण्यात येईल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असून प्रत्यक्षात झालेल्या 240796 मतांची 25-25 च्या गठ्ठयात जुळवणी करून त्यातून वैध अवैध मते बाजूला करणे आणि ३५ उमेदवारांचे पसंतीक्रम ठरवणे अत्यंत वेळखाऊ काम आहे. रात्री ८ वाजेपर्यंत हि जुळवाजुळव झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल.
औरंगाबाच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील मराठवाडा प्रायव्हेट लिमिटेड च्या जागेत मतमोजणी सुरु आहे. 373166 पैकी 240796 मतांची मोजणी करायची आहे. या मतांची ५६ टेबलवर जुळवाजुळव चालू आहे. दरम्यान मतांच्या घड्या उघडल्या जात असताना काही मतदारांनी मराठा आरक्षण विषयी चा मजकूर मत पत्रिकेच्या मागील बाजूने लिहिला आहे तर काहींनी मोबाईल नंबर आणि स्वतःची नावे टाकली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . अर्थात ही सर्व मते बाद होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.