Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला , दिलेल्या सवलती मात्र कायम

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील  कोरोना संसर्गाची वाढती स्थिती आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता  लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान  राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाईन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Advertisements

दरम्यान राज्यात टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

Advertisements
Advertisements

देशात सर्वत्र दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली असताना अहमदाबाद , दिल्ली व देशातील अन्य प्रमुख शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.  त्यामुळे राज्य सरकारकडून वेळीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीनंतर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात घेऊन तातडीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. विमानतळावरही सशुल्क कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करताना तिथेही कठोर नियमावली ठेवण्यात आली आहे. त्यात आता लॉकडाऊनबाबतही अगदी सावध निर्णय सरकारने घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!