IndiaNewsUpdate : कोरोनावरील लस येईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच , उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी लस येईपर्यंत दिल्लीत शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी त्यांनी पत्रकारांसी संवाद साधला. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात मार्च महिन्यापासून लॉकडाउन लागू करण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच सध्या देशात सुरू असलेल्या अनलॉक प्रक्रियेदरम्यान शाळा, महाविद्यालयं उघडण्याचा अधिकार केंद्रानं राज्यांना दिला आहे. “जोपर्यंत आम्हाला करोनावरील लस मिळत नाही तोपर्यं दिल्लीतील शाळा उघडण्याच्या शक्यता कमी आहे,” असं सिसोदिया म्हणाले. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी पुढील घोषणा करेपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सध्या पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवू इच्छित नाहीत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले होते.
“आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सातत्यानं प्रतिक्रिया घेत आहोत. शाळा पुन्हा सुरू करणं सुरक्षित आहे किंवा नाही याची त्यांना चिंता आहे. ज्या ठिकाणी पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या त्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला. म्हणूनच पुढील आदेशापर्यंत शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार नाहीत,” असंही सिसोदिया यांनी यापूर्वी सांगितलं होतं.