MumbaiCrimeUpdate : हास्य अभिनेत्री भारती आणि तिच्या पतीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अखेर घरात गांजा बाळगल्याच्या आरोपावरून अटकेत असलेली हास्य अभिनेत्री भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांसमोरही जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघांनीही जामीनासाठी अर्ज केलेला आहे. आता दोघांच्याही जामीन अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी केली जाणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर आज भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिची चौकशी केली असता तिने गांजा सेवन केल्याची कबुली दिली. हर्षही एकत्र गांजा सेवन करायचा.