MaharashtraNewsUpdate : शाळा जरूर सुरु करा पण जबाबदारीचे पालन करताना तुमचे तुम्ही पाहा , अशी आहे राज्य सरकारची भूमिका !!

कोरोना काळात बंद झालेल्या शाळा कधी सुरु होणार ? याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत असल्याचे वृत्त आहे मात्र त्यासाठी शिक्षकांची मोफत कोरोना चाचणी सोडली तर शाळा र्निजतुक करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा सर्व जबाबदाऱ्या शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत त्यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे.
शासनाने घोषित केल्याप्रमाणे राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी शाळा र्निजतूक करणे, आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे अशी सर्व व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यामध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, करोना प्रादुर्भाव झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांची कोरोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात येईल , असे शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला सांगितले असून ही चाचणी २२ नोव्हेंबपर्यंत करायची आहे.
दरम्यान लोकसत्ता ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पालिका क्षेत्रात मनपाच्या १ हजार १२२ शाळा आणि खासगी, विनाअनुदानित मिळून १५०० पेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये मिळून ६० हजारपेक्षा अधिक शिक्षक, कर्मचारी आहेत. रोजच्या संशयित रुग्णांबरोबरच एवढय़ा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चाचणी अवघ्या पाच दिवसांत होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच एवढय़ा शाळा र्निजतूक करणे आणि बाकी सर्व व्यवस्था करण्यासाठीही २२ तारखेपर्यंतचा कालावधी पुरेसा नाही, असा आक्षेप शिक्षक संघटनांनी घेतला आहे. शिक्षकांच्या चाचणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे सर्व तयारीचा आढावा घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.