CoronaIndiaUpdate : दिलासादायक : समजून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती

देशभरात गेल्या २४ तासांत ४४९ रुग्णांचा मृत्यू झालाअसून त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३० हजार ५१९ वर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनामुक्तांचे प्रमाण ९३.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुका व सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा किती प्रादुर्भाव झाला हे ८-१० दिवसांनंतर स्पष्ट होईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. गेल्या चार आठवडय़ांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ सरासरी ४८ हजार झाली. सप्टेंबरच्या मध्यात दैनंदिन रुग्णवाढ ९० हजारांच्या शिखरावर पोहोचली होती. अजूनही ७६ टक्के उपचाराधीन रुग्ण १० राज्यांमध्ये असून, त्यापैकी १९ टक्के महाराष्ट्रात, १५.५ टक्के केरळमध्ये, ९ टक्के दिल्लीत आहेत.
देशात करोनाची दैनंदिन रुग्णवाढ चार महिन्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी ३० हजारांखाली नोंदविण्यात आली. सणासुदीत करोनाचा प्रादुर्भाव किती झाला, हे स्पष्ट होण्यास काही दिवस लागणार असले तरी तूर्त दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख घसरणे हे आशादायी चित्र मानले जाते. देशभरात गेल्या २४ तासांत करोनाचे २९,१६३ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ८८ लाख ७४ हजार २९० झाली आहे. त्यापैकी ८२ लाख ९० हजार ३७० करोनामुक्त झाले असून, ४ लाख ५३ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आधी १५ जुलै रोजी ३० हजारांपेक्षा कमी रुग्णनोंद झाली होती.
दरम्यान अमेरिकेतील ‘मॉडर्ना इन्कॉर्पोरेशन’ या कंपनीची करोना प्रतिबंधक लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लशीच्या माध्यमातून करोनाप्रतिबंध करण्याच्या प्रयत्नातील हे दुसरे मोठे यश आहे. गेल्या आठवडय़ात अमेरिकेच्या फायझर कंपनीने जर्मनीच्या बायोएनटेक या कंपनीकडून तयार करून घेतलेली लस ९० टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते.