AurangabadNewsUpdate : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पिता -पूत्र ठार झाल्यानंतर वन विभागाला आली जाग , हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील आपेगाव येथे काल सोमवारी अशोक सखाहरी औटे (वय ५० ) आणि त्यांचा मुलगा कृष्णा अशोक औटे ( २२ ) यांचे मृतदेह सापडल्यानंतर पैठण तालुक्यातील पूर्व भागातील नदी काठच्या गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे . या दोघा बाप-लेकाला अज्ञात हिंस्त्र प्राणी म्हणजेच वाघ किंवा बिबट्या ने हल्ला करून ठार मारल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून हल्लेखोर प्राण्याचा शोध घेतला जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या या पितापुत्राचा मंगळवारी सकाळी शवविच्छेदन पैठण येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्राण्याच्या शोधासाठी वन विभागाने स्वतंत्र पथक तैनात केले असून पीडित कुटुंबियांना शासनाकडून नियमाप्रमाणे मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे तर तहसीलदारांनी या सर्व भागातील शेतकऱ्यांनी तूर्त शेतात एकटे न जाण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल असे मुख्य वन अधिकारी प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
वडिलांना बघण्यासाठी गेला होता मुलगा…
सोमवारी दुपारी आपेगाव येथील शेतकरी अशोक औटे हे त्यांच्या गावाजवळील शेतात गेले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने, त्यांचा मुलगा कृष्णा औटे हा वडिलांना बघण्यासाठी शेतात गेला. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत हे दोन्ही पितापुत्र घरी न आल्याने, गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांना पिता अशोक औटे व मुलगा कृष्णा औटे या दोघांचे मृतदेह शेतात आढळले. छिन्हविछिन्ह अवस्थेत असलेले पिता-पुत्राचे मृतदेह बघितल्यावर, बिबट्याच्या हल्ल्यात या दोघांचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून पाचोड व विहामांडवा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या निदर्शनास आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते .
शेतात एकटे न जाण्याचे आवाहन
दरम्यान, हि घटना समोर आल्यावर, या पितापुत्राचा कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत मिळावी या साठीची शासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व आपेगाव परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. सध्यातरी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात एकटे जाऊ नये, असे आवाहन पैठणमधील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
पैठण तालुक्यातील आपेगाव येथे पिता पुत्र बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे हलगर्जी वनविभागातील अधिकारी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करु. असे स्पष्टीकरण चीफ फाॅरेस्ट कन्झर्व्हेटिव आॅफिसर प्रकाश महाजन यांनी “महानायक”शी बोलतांना सांगितले. या घटनेनंतर वनविभाग या खडबडून जागा झाला असून या बिबट्याच्या शोधार्थ युध्दपातळीवर पथक तैनात करण्यात आले असल्याचे महाजन म्हणाले.
दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नियमानुसार कुटुंबास आर्थिक मदत तात्काळ कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे म्हटले आहे. ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून एक पथक सतत आपेगाव व परिसरात राहणार असून सापळा लावणे , आवश्यकतेनुसार पिंजरा लावणे , tranquilizer ( बेशुद्ध करणे ) ची बंदूक वापरून जंगली श्वापद / बिबट्या पकडणे इत्यादी बाबी करण्यात येत आहेत . कोणीही घाबरून जाऊ नये . तथापि एकट्याने फिरु नये , असे आवाहन शशिकांत तांबे , किशोर पवार चंद्रकांत शेळकेयांनी केले आहे .