MaharashtraNewsUpdate : प्रसिद्ध सुवर्णकार आर. सी. बाफना यांचे निधन

प्रसिद्ध सुवर्णकार आणि सामाजिक कार्यकर्ते दानशूर रतनलाल सी बाफना यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोने-चांदीच्या व्यवसायात आर. सी.बाफना ज्वेलर्स हा ब्रँड रतनलाल बाफना यांनी नावारुपास आणला आहे. रतनलाल बाफना यांचा जन्म राजस्थानमधील भोपालगड येथे झाला. 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स इथं नोकरी केली होती. तब्बल 19 वर्ष त्यांनी नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली आणि स्वत: च्या नावाने म्हणजे आर. सी. बाफना ज्वेलर्स हे दुकान सुरू केले. 1974 मध्ये लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. जळगावनंतर औरंगाबाद आणि नाशिकमध्येही आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहे. यासोबत जळगावात गोशाळा सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, आज पाडव्याच्या दिवशी रतनलाल बाफना यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सूवर्ण व्यावसयिकांवर शोककळा पसरली आहे. रतनलाल सी. बाफना यांनी सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेत होते. बाफना यांनी अनेक सामाजिक उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करत होते. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर.सी.बाफना यांनी आधार दिला. त्याच बरोबर जैन समाजासाठीही बाफना यांचे मोठे योगदान आहे. गोरक्षा अशा कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनींसाठी निवास्थान, धर्मशाळा सुरू केल्या होत्या.
बाफना यांच्या पश्चात पत्नी,मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची मुलं सुद्धा आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम पाहत आहे. त्यांच्या निधनामुळे सुवर्णनगरी पोरकी झाली अशी भावना व्यक्त होत आहे.