CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात राज्यात आढळले ३ हजार २७७ नवे करोनाबाधित रुग्ण

गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार २७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के एवढा आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाख २३ हजार १३५ झाली आहे.सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ८२ हजार ९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २३ हजार १३५ (१८.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत. तर ७ हजार ५८६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
दरम्यान कोविड पोर्टल तांत्रिक कारणाने बंद असल्याने अन्य तपशील आज उपलब्ध नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात २० मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि हे मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झालेले आहेत. त्याबाबत पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यात आधी झालेल्या व नोंद न झालेल्या एकूण ६५ मृत्यूंची आज भर पडली असल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या कोविड पोर्टल नुसार राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची दैनंदिन माहिती अद्ययावत करण्यात येते तथापि आज कोविड पोर्टल तांत्रिक कारणाने बंद असल्याने दैनंदिन बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.
मुंबईतील दैनंदिन करोना बाधित रुग्णांचा आकडा आज खूप खाली आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५९९ नवीन बाधितांची नोंद झाली तर ५०७ रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबई पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांत सध्या १६ हजार ९२३ रुग्णांवर उपचार आहेत. आतापर्यंत एकूण २ लाख ६५ हजार १४२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ लाख ३७ हजार २९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर १० हजार ४६२ जणांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील करोना रिकव्हरी रेट ९० टक्के इतका असून रुग्ण दुपटीचा कालावधी २२९ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.