MaharashtraNewsUpdate : ” मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान दिले…” खडसेंच्या या वक्तव्यावर ब्राह्मण खवळले , महासंघाने दिला हा इशारा

वक्तव्य अंगलट येताच खडसे यांनी व्यक्त केली दिलगिरी
भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे आपल्या अनेक वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत . अशाच एका वक्तव्यामुळे ब्राह्मण महासंघ त्यांच्यावर खवळला असून ” मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान दिले…” हे वक्तव्य एकनाथ खडसेंनी माफी मागून मागे न घेतल्यास पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे.दरम्यान खडसे यांनी ट्विट करताना म्हटले आहे कि, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी दिलगिरी व्यक्त करतो.
मुक्ताईनगरात दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांसमोर बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी फडणवीसांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. ‘नाथाभाऊ दिलदार आहे. मी भल्याभल्यांना दोन देतो, मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. म्हणून मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केलं,’ असं ते म्हणाले होते. खडसे यांच्या या वक्तव्याला ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला आहे. या वक्तव्याबद्दल खडसेंनी माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना जाब विचारण्यात येईल,’ असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे. ‘दान देण्यासाठी मुळात ती गोष्ट आपल्या अधिकारात असायला हवी. एवढंही ज्ञान खडसेंना नाही,’ याबद्दल दवे यांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं.
दरम्यान खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करत दवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादीनं खडसेंना समज न दिल्यास पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही महासंघानं दिला आहे.
खडसे यांनी व्यक्त केली दिलगिरी
हे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच खडसे यांनी ट्विट केले आहे कि , दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020