AnvayNaikSuicideCase : ताजी बातमी : अर्णब गोस्वामीसह तीन आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Anvay Naik suicide case: Republic TV Editor-in-chief Arnab Goswami and two others – Feroz Shaikh and Nitesh Sarda – sent to 14-day judicial custody by Alibag District Magistrate Court.
— ANI (@ANI) November 4, 2020
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामीसह फेरोज शेख आणि नितेश सारडा यांना अटक करून अलिबाग न्यायालयासमोर हजार केल्यानंतर न्यायालयाने या तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . त्यामुळे जामीन मिळेपर्यंत अर्णब गोस्वामीसह या तिघांनाही तुरुंगात राहावे लागणार आहे. दरम्यान, अर्णब यांच्यावतीने लगेचच कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
अर्णब यांना मुंबईतील निवासस्थानातून आज सकाळी अटक करण्यात आले होते. मुंबई पोलीस आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. आपल्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा अर्णब यांनी कोर्टात केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार वैद्यकीय तपासणी झाली व आता कोर्टाने अर्णब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून कोर्टात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली. ‘पोलिसांनी पूर्वी दिलेल्या क्लोजर रिपोर्टला कोणीही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे तो अजूनही अस्तित्वात आहे आणि आता आरोपीकडून काय हस्तगत करायचे आहे, नेमकी काय चौकशी करायची आहे, याविषयी पालिसांनी सकृतदर्शनी ठोस काही दाखवलेले नाही आणि ठोस पुरावे दिलेले नाहीत’, असे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले.
गेल्यावर्षी या प्रकरणाची फाइल बंद करण्यात आली होती. दरम्यान, अन्वय नाईक यांची पत्नी व मुलगी मात्र सातत्याने याप्रकरणी चौकशीची मागणी करत होते. अन्वय यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात नव्याने तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिले असून त्यानुसारच अर्णब यांना अटक करण्यात आली आहे.आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आणि अलिबागच्या जिल्हा न्यायालयासमोर उभं करण्यात आलं . यावेळी अर्णबच्या वकिलांनी त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले त्यावर असे काहीही घडले नसून अटकेचे पूर्ण चित्रीकरण केले असल्याचे सांगितले .
दुसराही गुन्हा दाखल
दरम्यान अटकेच्या वेळी पोलिसांना सहकार्य न करता पोलिसांशी वाद घालून , महिला पोलिसांशी गैरवर्तन करून शासकीय कार्यात अडथळा आल्याच्या आरोपावरून आता मुंबई पोलिसांनीही अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध भादंवि ३५३, ५०६, ५०७ अन्वये आणखी गुन्हा दाखल केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. मात्र अर्णब यांनीच महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पोलीस पथक जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले.
FIR registered against Republic TV Editor-in-chief Arnab Goswami for allegedly assaulting a lady police officer when police team reached his residence in Mumbai this morning.
— ANI (@ANI) November 4, 2020