AurangabadNewsUpdate : निलंबित नायब तहसीलदारांच्या मुलाची आत्महत्या, पोलिसांकडून मिळालेली वागणूक आणि मित्र-मैत्रिणीवर व्यक्त केला राग

निलंबित नायब तहसीलदार असलेल्या वडिलांवर दाखल गुन्ह्यात त्यांना शोधण्यासाठी घरी आलेल्या पोलिसांकडून कुटुंबियांना मिळालेली वागणूक तसेच मित्र आणि मैत्रिणींने ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणातून एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले असून जोपर्यंत दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
साहेबराव नामदेव देशटवाड, (वय-२८, राहणार, टीव्ही सेंटर चौक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताचे वडील आणि भाऊ यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत साहेबरावचे वडील पैठण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर रेशनकार्ड संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एकूण पाच आरोपी असून त्यामध्ये दोन तहसीलदार यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रकरणात देशटवाड यांना निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पैठण पोलीस करीत असून गेल्या महिन्याच्या १२ सप्टेंबर रोजी पैठण ठाण्यातील फौजदार हे दोन कर्मचाऱ्यांसह देशटवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अर्वाच भाषा वापरून शिवीगाळ केली. तसंच मृतांची आई बाथरूममध्ये असताना दरवाज्याला ठोठावत हात धरून ओढले, असा आरोप करीत मृत तरुणाने हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तरुणाने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेल्या माहितीनुसार एका तरुणीसोबत मृत साहेबराव देशटवाड याचे संबंध होते. ही तरुणी मित्राच्या साथीने मृत तरुणाला वारंवार पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करीत होती. एवढंच नाही तर तरुणीने व्हॉट्सअॅपवर एक लिंक टाकून मृताच्या खात्यातून सर्व रक्कम लंपास केली होती. या सर्व विवनचनेतून साहेबरावने एका डायरीमध्ये सुमारे 20 पाणी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये तीन ते चार मित्रांची नावं, ज्या तरुणी सोबत संबंध होते तिचे नाव, वडिलांसोबत गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका तहसीलदाराचे नाव आणि पैठण पोलीस ठाण्यातील एका फौजदाराच्या नावाचा उल्लेख केला आहे. न्यूज १८ लोकमतने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान शनिवारी रात्री तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला तेथेच तो नेहमी झोपण्यासाठी जात होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो खाली येत नसल्याने घरच्यांनी त्या खोलीमध्ये पाहिले असता साहेबरावने साडीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याची निदर्शनास आले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण जोपर्यंत सुसाईड नोटमधील नमूद केलेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचे मृताचे वडील देशटवाड यांनी म्हटले आहे.