MumbaiNewsUpdate : “या” प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी , आरोपी गजाआड , कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी

प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी रविवारी अहमदनगर येथून एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संदीप मच्छिंद्र वाघ असे आरोपीचे नाव असून गेल्या वर्षभरापासून तो सय्यद हिला त्रास देत आहे. पोलिसांनी आरोपी वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली सय्यद या ऑगस्ट २०१९ मध्ये त्या अहमदनगरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी संदीप वाघ याने कुणाकडून तरी त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो कारण नसताना कॉल आणि मेसेज करत होता. त्यावर दीपाली यांनी त्याला ब्लॉक केले. ४ ऑक्टोबरला त्याने पुन्हा कॉल केला. वर्षभरापासून त्रास देणारा वाघ असल्याचे तेव्हा समजले नाही. मी अहमदनगरमधील पाथर्डी येथून बोलत असून, वाढदिवसाच्या पार्टीला येणार का ? असे त्याने विचारले. त्यावर वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्याचे एक लाख रुपये घेत असल्याचे तिने समोरील व्यक्तीला सांगितले. त्यावर वाघ याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान वाघ याने शिवीगाळ केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे दीपाली यांनी त्याला बजावले. त्यावर बलात्कार करण्याची आणि अहमदनगरमध्ये आली तर ठार मारेन, अशी धमकी त्याने दिली. या प्रकारानंतर दीपालीने त्यांच्या भावाशी संपर्क साधून सर्व हकिकत सांगितली. आरोपीचा क्रमांकही त्यांनी भावाला दिला. त्यानेही संपर्क साधून त्याला याबाबत विचारलं असता त्याने भावालाही शिवीगाळ केली. ती ड्रग पुरवते असे खोटेही त्याने तिच्याबद्दल सांगितले. अखेर दीपाली यांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.