MaharashtraPoliticalUpdate : चिल्लर , थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळ नाही , उद्धव ठाकरे यांचे देवेन्द्र फडणवीस यांना उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”मदत किती, कशी? कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. पंचनामे पूर्ण होत आले आहेत. आढावा घेणं सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणासुदीला राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही. केंद्राकडून जीएसटी येणं बाकी आहे. पण दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते म्हणाले कि ,”याकडे बघायला मला वेळच नाहीये. शेतकरी आणि माझी जनता यांच्याकडे माझं लक्ष असल्यानंतर, हे चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला.
तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाईसाठी तात्काळ मदत घोषित केली. त्याचं वाटपही सुरू झालं आहे, असा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर बोलताना ठाकरे म्हणाले,”चांगलं आहे. माझा एक स्वभाव आहे, जे करायचं ते व्यवस्थित करायचं. जोरात सुरूवात करायची, नंतर अडकलं. त्याला काही उपयोग नाही. जाहीर करायचं व करू नाही शकलो, तेही उपयोगी नाही. जे करू ते ठोस व ठाम करू. मुंबईत काम सुरू आहे. एक दोन दिवसात दसरा आहे. नंतर दिवाळी आहे, अशा स्थिती मी जनतेच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले.