MumbaiNewsUpdate : ट्विटरक्वीन कंगना राणावत हिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

आपल्या बिनधास्त ट्विटमुळे चर्चेत आलेली ट्विटरक्वीन अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरुद्ध केरळ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईतील वांद्रे न्यायालयानेही कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात येत आहे. वांद्रे कोर्टात मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. कंगनानं बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, टी.व्ही, सोशल मीडिया या माध्यामांतून ती बॉलिवूडविरोधात बोलत आहे. कंगना सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडवर टीका करतेय, असा आरोप याचिकेत केला आहे. आज तक या वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान कंगनाच्या ट्विटमुळे बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ती सातत्याने अक्षेपार्ह ट्विट करतेय. तिच्या ट्विट धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आहेतच पण यामुळं फिल्म इंटस्ट्रीमधील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ कोर्टात पुरावे म्हणून सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टानं कलम १५६ (३) अंतर्गंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलिस स्थानकात कंगनाविरुद्धात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. या नंतर याचिकादारांनी या प्रकरणी वांद्रे कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानंही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.