MaharashtraNewsUpdate : महिला आणि बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना झाली ३ महिन्याची शिक्षा आणि १५ हजाराचा दंड

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. आठ वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला व प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयाने या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसंच कारचालक आणि दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना या प्रकरणी शिक्षा सुनावली जाताच भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदरच केला आहे. मी स्वतः वकील आहे त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणा आहोत. शेवटी सत्याचा विजय होईल असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. भाजपाने जी मागणी केली आहे त्याबाबत यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजपा लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजपासोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण मी माघार घेणार नाही. भाजपाशी माझी लढाई सुरूच राहील.”