MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाची लढाई आता एमपीएससी परीक्षा थांबवण्यासाठी , आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना एमपीएससी परीक्षा घेऊन नयेत या मराठा संघटनेच्या मागणीवर आज गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.
दरम्यान या प्रश्नावर बुधवारी नवी मुंबईत बैठक झाली. त्यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, या बैठकीत ‘११ तारखेला जर एमपीएससी ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’ मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार भाषण करत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
खा . संभाजी राजे म्हणाले कि , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्र्यांनी कुणाशी आणि काय बोलायचं याची विचारणा केली. मी म्हटलं मराठा समाजाची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही बोलावलं तर चर्चेसाठी आम्ही येण्यासाठी तयार आहोत. पण, एमपीएससी च्या ११ तारखेला जर परीक्षा झाल्या तर सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागेल’, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी नेतृत्त्व करणार नाही, तर खांद्याला खांदा लावून लढा देणार आहे. ज्यांना नेतृत्व करायचे आहे. त्यांनी जबाबदारी घेऊन पुढे यावे आणि लढा द्यावा. पण आज मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहे. मराठा समाजात दुफळी आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहे. हे दुर्दैवाचे आहे, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.