MaharshtraNewsUpdate : एमपीएससीच्या परीक्षा वेळेनुसारच , मराठा संघटनांनी केला होता विरोध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी आपली भूमिका जाहीर केली असून हि ठरलेल्या तारखेला म्हणजे परीक्षा ११ ऑक्टोबरलाच पूर्व परीक्षा होणार असल्याचं आयोगाने आज जाहीर केलं आहे . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. परीक्षा आणि भरती दोन्ही शासनाच्या निर्णयानुसार होणार आहेत असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान काही मराठा संघटनांनी एमपीएससीच्या परीक्षांना विरोध केला होता. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा तुटत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित ठेवण्याची मागणी काही मराठा संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग निश्चित होत नाही तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये या मागणीसाठी मराठा आरक्षाच्या प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी मुंबईतल्या एमपीएससी कार्यालयाला घेराव घातला होता. या आधी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेऊन त्याचा निकाल हा मराठा आरक्षणाची स्थगिती उठल्यानंतर निकाल जाहीर करू ही घेतलेली भूमिका म्हणजे निव्वळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फसवणूक आहे असा संघटनेचा आरोप आहे. जर एखादा व्यक्ती परीक्षा झाल्यानंतर कोर्टात गेल्यास विरोधात निकाल येऊ शकतो. जर वयाच्या संदर्भात दुमत असेल तर एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केली आहे.