hatharasGangRapeCase : हाथरस आंदोलन प्रकरणात भीम आर्मी आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे

उत्तर प्रदेशाच्या हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील वणवा अजून पेटलेलाच आहे. २९ सप्टेंबरला रात्री उशिरा या पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशिवाय अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे पीडित मुलीच्या कुटुंबीयांची संमती न घेताच पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने हा हा विधी उरकून घेतला. त्यानंतर या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस, रालोद, आप आणि भीम आर्मीने आंदोलन केले. या प्रकरणी आता काँग्रेसचे ५०० कार्यकर्ते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचं कलम १४४ आणि एपिडेमिक अॅक्टचा भंग केल्याचा गुन्हा या सगळ्यांविरोधात आहे. एकूण ४०० जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कलम १४७, कलम ३४१, १८८, २६९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. दंगलीसाठी चिथावणी देणे , सामाजिक नियमांचा भंग, रोग संसर्ग पसरण्यासारख्या कृती यावर आधारित हे गुन्हे आहेत. असेच गुन्हे काँग्रेसच्याही सुमारे ५०० कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौन कधी सोडणार असा प्रश्न विचारला आहे. तर आज आपचे नेते संजय सिंह हे जेव्हा हाथरस या ठिकाणी आले होते. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. त्यांचा निषेध करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या.
पिडीतेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हाथरस जिल्ह्यात त्यांच्या १९ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. तिला मारहाण करुन तिची जीभही छाटण्यात आली. त्यानंतर या पीडितेवर आधी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नंतर दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र २९ सप्टेंबरच्या रात्री उशिरा तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर या पीडितेचा मृतदेह पोलिसांनी जाळला. ज्यावरुन उत्तर प्रदेशातला आक्रोश हा देशभरात पोहचला . काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हे पहिल्यांदा हाथरसला पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहचले तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. एवढंच नाही तर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोपही झाला. तिसऱ्या दिवशीही असाच प्रकार झाला . त्यानंतर काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी देशभरातल्या विविध ठिकाणी आंदोलनं केली. आणि अजूनही आंदोलने चालूच आहेत.