MarathawadaNewsUpdate : आत्महत्या केलेल्या विवेक रहाडेची ” ती ” चिट्ठी नाही , पोलिसांकडून गुन्हा दाखल

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणावरून वातावरण चिघळलेले असताना बीड जिल्ह्यातील बारावी झालेल्या विद्यार्थ्याने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगत रान पेटविण्यात आले होते. मात्र, ज्या सुसाईड नोटच्या आधारे हा दावा केला गेला, त्यातील अक्षर त्या विद्यार्थ्यांचे नसून ती नोट बनावट असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. त्यामुळे बनावट सुसाईड नोट लिहून सामाजिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि , बीड जिल्ह्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे (वय १८) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचा मजकूर लिहिण्यात आलेला होता. ही चिठ्ठी काही वेळात सोशल मीडियात व्हायरल झाली. राज्यभर यावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी ट्विट करून याबद्ल संतापही व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह खा . छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक नेत्यांनी यावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी संयम बाळगावा असे आवाहन करीत ट्वीट केले होते. यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी मराठा नेत्यांवर निशाणा साधत सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचे संकेतही दिले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेत शरद पवार यांनाही पत्रकारांनी विचारलेल्या उत्तरे द्यावी लागली होती.
दरम्यान पोलीस तपासात मात्र आता विवेकच्या नावे लिहिलेली ती चिठ्ठीच बनावट असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बीड ग्रामीण पोलिसांनी या चिठ्ठीची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तापसणी करून घेतली. त्यासाठी विवेकच्या शाळा आणि कॉलेजमधील उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्या हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या. त्या आधारे तज्ज्ञांनी हस्ताक्षराची पडताळणी करून पोलिसांना अहवाल दिला आहे. या चिठ्ठीतील अक्षर रहाडे याचे नसल्याचे त्यात म्हटले आहे. विवेक रहाडे याने ३० स्पटेंबरला आत्महत्या केली होती. त्याला नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज त्याच्या मामांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. मात्र, मध्येच ही चिठ्ठी पुढे आली. ती सोशल मीडियात व्हायरल झाली आणि प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आपल्याला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकत नसल्याचा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे. दरम्यान ही चिठ्ठी बनावट असल्याने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात ती लिहिणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाडे याच्या आत्महत्येवरून सामाजिक अशांता भंग करण्याच्या उद्देशाने कोणी तरी त्याच्या नावाने ही चिठ्ठी लिहून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.