HathrasGangrapeCase : तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखले

https://twitter.com/ANI/status/1311927975344893952
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेटू दिलं नाही. त्यांच्यापाठोपाठ आज तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं आहे. दरम्यान हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देश ढवळून निघाला आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार उरकरण्यात आले. या घटनेवरून संप्तप भावना व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेश प्रशासनानं हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखण्याची भूमिका घेतल्यानं योगी सरकारवर टीका होऊ लागली आहे.
राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी भेट घेण्यापासून रोखलं. हाथरसच्या सीमेवरचं पोलिसांनी या शिष्टमंडळाला थांबवलं. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यावर तृणमूलचे खासदार ठाम राहिले. यावेळी पोलिसांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी धक्का दिल्यानं खासदार डेरेक ओब्रायन खाली कोसळले. “आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होतो. पण आम्हाला परवानगी दिली गेली नाही. आम्ही भेटण्याचा आग्रह धरला. मात्र महिला पोलिसांनी आमच्या खासदार प्रतिमा मोंडल यांचे कपडे फाडले व लाठीचार्ज केला. त्या खाली कोसळल्या. पुरूष पोलिसांनीही त्यांना हात स्पर्श केला. हे लज्जास्पद आहे,” असा आरोप तृणमूलच्या नेत्या ममता ठाकून यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी १ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही नेत्यांना कुटुंबीयांची भेट घेण्यापासून पोलिसांनी रोखलं. तसेच कलम १४४चं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे.