NagpurCrimeUpdate : प्रियकरासमोर अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

देशभरात हाथर्स येथील बलात्कार प्रकरणाची निर्भत्सना केली जात असतानाच एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेनं नागपूर शहर हादरलं आहे. महिनाभरापूर्वी शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींवर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावं आहेत. दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत संवेदनशील आहे. आरोपीना पकडण्याची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी यश मेश्राम हा पीडित मुलीच्या घराजवळ राहातो. यश यानं पीडितेशी मैत्री केली होती. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. आरोपी यश याने २५ ऑगस्टच्या सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पीडित मुलीला फिरून येऊ असं सांगितलं. पीडितेनं होकार दिल्यानंतर यश आणि पीडिता दुचाकीनं नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉनजवळ गेले. तिथं त्या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित केले. दोघे ‘त्या’ अवस्थेत असताना तिथे आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले पोहोचले. त्यांनी पीडितेला शरीरसुखाची मागणी केली. मात्र, पीडितेनं नकार देताच तिला जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडितेवर तिच्या प्रियकरासमोरच सामूहिक बलात्कार केला.