MumbaiNewsUpdate : वकिलांना हवी होती लोकल सेवा , कोर्ट म्हणाले वकीलच कशाला राज्यसरकारने समाजातील सर्वच घटकांचा विचार करून मार्ग काढावा …

मुंबईतील वकील संघटनांना हवी होती लोकल सेवा , त्यावर कोर्ट म्हणाले वकीलच कशाला अनेक लोक बेरोजगार होत आहेत, त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता नियोजित पद्धतीने मुंबई लोकल व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवांतील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा. मुंबईत सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी करणारी जनहित याचिका नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सरकारला उपरोक्त निर्देश दिले. ‘केवळ वकिलांविषयी नव्हे तर समाजातील सर्वच घटकांच्या सोयीसाठी यातून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करून योग्य त्या सूचना मांडाव्यात,’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. कंपनी व कार्यालयांतही उपस्थिती वाढवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्यानं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल सेवेचा ताण अन्य वाहतूक व्यवस्थेवर येत आहे. परिणामी मुंबईसारख्या शहरात मोठी गर्दी होत आहे. त्यातून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत व करोना संसर्गाचा धोकाही निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्याची मागणी राजकीय पक्ष व प्रवासी संघटनांकडून होत आहे. दरम्यान ‘वकील संघटनांनी राज्य सरकारकडे सूचना मांडाव्यात आणि त्यांचा विचार करून कोणत्या सूचनांची अंमलबजावणी करता येईल त्याविषयी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडावी, असं न्यायालयानं सरकारला सांगितलं.