CrimeNewsUpdate : पत्रकारावर दिवसाढवळ्या घातल्या गोळ्या

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात एका पत्रकारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. पत्रकारावर गोळ्या झाडल्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. गोपालगंज जिल्ह्यातील माझागढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या बाजारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. पत्रकार राजन पांडेय हे सकाळी घराबाहेर पडले. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतर राजन रस्त्यावरच कोसळले. स्थानिकांच्या मदतीने राजन यांना गोपालगंजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर राजन यांना गंभीर जखमी अवस्थेत गोरखपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर राजन यांना गोरखपूर येथे घेऊन जात असताना, त्यांनी हल्लेखोरांची नावे सांगितली. राजन मुलांचे क्लासही घेतात. त्यासाठी ते घराबाहेर पडले होते. त्याचवेळी रस्त्यात राजेंद्र यादव (अदमापूर), राजकुमार सिंह आणि नन्हे सिंह यांनी त्यांचा पाठलाग केला आणि गोळ्या झाडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले की, पत्रकारावर गोळ्या झाडणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. काही ठिकाणी छापेमारी केली जात आहे.