MarathaReservation : मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी गाठली दिल्ली , जंतर- मंतरवर केले आंदोलन

मराठा आरक्षणाचा आक्रोश मराठी तरुणांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णया विरोधात आणि मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यात यावा यासाठी राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने धरणे प्रदर्शन करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणासाठी केंद्र शासनाने तातडीने पावलं टाकत आरक्षणाचा कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता आंदोलनाचे लोण आता दिल्लीतही पोहोचले असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आवाज दिल्लीत पोहोचवावा म्हणून राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील अनेक तरुण आज दिल्लीत दाखल झाले होते. पण कोरोनामुळे दिल्ली पोलिसांनी फक्त मोजक्याच तरुणांना आंदोलन करण्याची परवानगी दिली होती असे या प्रदर्शनाचे संयोजक गंगाधर काळकुटे पाटील यांनी सांगितले. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात हे धरणे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि सामाजिक अंतर पाळत धरणे प्रदर्शन करण्यात आले. यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील एक निवेदन पंतप्रधान कार्यालयालाही देण्यात आले.मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी, केंद्र सरकारने त्यासाठी अध्यादेश काढावा, राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असेपर्यंत आरक्षणाच्या सवलती कायम ठेवाव्यात, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेे मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, सुप्रीम कोर्टाने घटनात्मक खंडपीठाची लवकरात लवकर स्थापन करून तत्काळ सुनावणी सुरू करावी यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रस्ताव दाखल करावा अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनेे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करून 2000 कोटी रुपये निधी द्यावा आणि मराठा समाजातील बेरोजगारी निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत अशा मागण्याही या प्रदर्शनात करण्यात आल्या आहेत.