MaharashtraNewsUpdate : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा , अशोक चव्हाण यांनी घेतली शरद पवार यांची भेट

सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समजाला दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यानंतरही एखादी बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय निर्णय घेण्यात येऊ शकतो. दरम्यान, मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात काल मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली. त्याआधी अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेले केंद्र सरकारचे आरक्षण मराठा समाजाला लागू करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच सारथी संस्थेला जादा निधी देऊन मराठा समाजातील घटकांना मदत देण्यात येऊ शकते. तसेच मराठा विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठा आरक्षणाची धुरा सांभाळणारे काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात आज मराठा आरक्षण स्थगितीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे . राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागावा यासाठी आधीही प्रयत्नशील होतो, आजही आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली. ते म्हणाले, की स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याची माहिती पवारांना दिली त्यांचाशी चर्चा केली. त्यांनीही आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे त्याची तयारी सुरू आहे, त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली. कायदेशीर मुद्दे आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती, त्याची माहिती शरद पवारांना दिली. आपण न्यायालयात जातो आहेच, घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करीत आहोत असेही चव्हाण म्हणाले.