AurangabadCrimeUpdate : लाचखोर सरपंच पती एसीबीच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : तक्रारदाराच्या वडीलाच्या शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून त्याचा अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजाराची लाच घेणा-या महिला सरपंचाच्या पतीला अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गणेश रामू बोर्डे (वय ३३, रा.दरेगाव, ता.खुलताबाद) असे लाचखोर महिला सरपंचाच्या पतीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या वडीलाच्या शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करून त्याचा अहवाल पाठविण्यासाठी गणेश बोर्डे याने तक्रारदाराला २० हजाराची लाच मागीतली होती. तडजोडीअंती १० हजार रूपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मारूती पंडीत, जमादार प्रकाश घुगरे, रविंद्र देशमुख, मिलिंद इप्पर, कपील गाडेकर, चंद्रकांत शिंदे आदींच्या पथकाने खुलताबाद येथील पंचायत समिती कार्यालया समोर सापळा रचून गणेश बोर्डे याला १० हजाराची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.