MumbaiNewsUpdate : कंगना मुंबई विमानतळावर येताच हातावर ” होम होम क्वॉरंटाईन ” चा शिक्का , महापौर किशोरी पेडणेकर

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत येताच तिला होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी माहिती दिली असून पेडणेकर यांनी त्याबाबतचा थेट सरकारी नियमच दाखवला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. कंगना राणावत मुंबईत येताच नियमाप्रमाणे तिला होम क्वॉरंटाइन करण्यात येईल. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वॉरंटाइन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही क्वॉरंटाइन केलं जाणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार आहे. त्यामुळे ती मुंबई विमानतळावर येताच तिच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे.
आयसीएमआरने कोरोनाबाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार परराज्यातून आलेल्यांना १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले जाते. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का मारला जातो. याबाबत प्रशासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करेल, असं पेडणेकर यांनी सांगितलं.
दरम्यान, पालिकेच्या एका पथकाने आज कंगनाच्या कार्यालयाची पाहणी केली. कंगना राणावतचं पालीहिल येथे कार्यालय आहे. नुकतंच हे कार्यालय बांधण्यात आलं आहे. पालिकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने या कार्यालयात जाऊन त्याची पाहणी केली. हे कार्यालय नियमाप्रमाणेच बांधलं आहे की नाही, याची शहानिशा करण्यात आली. कंगनाने तिच्या कार्यालयात अंतर्गत बदल केले का? पालिकेच्या प्लाननुसारच हे बांधकाम झालंय का? बांधकाम करताना एफएसआयचं उल्लंघन तर झालं नाही ना? आदी गोष्टींची यावेळी पाहणी करण्यात आली. तसेच तिच्या कार्यालयापासून ते रस्त्यापर्यंतची मोजणीही करण्यात आली. कार्यालयासाठी अधिकची जागा तर घेतली नाही ना यासाठी ही मोजणी करण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कंगना भाजपाची पोपट : विजय वडेट्टीवार
दरम्यान, कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप थांबताना दिसत नाही. त्यात आता आघाडीतील इतर नेत्यांनीही उडी घेतली आहे. या वादात आता राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली असून त्यांनी कंगनाला भाजपची पोपट म्हणून संबोधले आहे. वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. कंगनाही भाजपची पोपट आहे. कंगना भाजपशी मिळालेली आहे हे मी आधीच सांगितलं होतं, असं सांगतानाच भाजप कंगनाला देशभक्तीचं प्रमाणपत्रं देत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. कंगना राणावत सध्या भाजपची बोली बोलत आहे. उद्या त्या भाजपच्या तिकीटावर राज्यसभेत किंवा विधान परिषदेवरही निवडून जातील, असं सांगतानाच ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगात आहे. त्या पोलिसांवर विश्वास नसणाऱ्यांना देशभक्त म्हणून सर्टिफिकेट दिलं जात असून वाय दर्जाची सुरक्षाही दिली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करताना तिला हरामखोर म्हटल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर अखेर त्यांनी सारवासारव केली आहे. मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे.