MaharashtraNewsUpdate : पत्रकारांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करू : राजेश टोपे

केंद्र सरकारच्या नियमानुसार पोलीस, डॉक्टर यांना करोना कालावधीत सेवा देताना मृत्यू झाल्यास, संबधिताच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले जात आहे. आता पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने, पत्रकारांना देखील ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिली.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पत्रकार हे प्रत्येक ठिकाणी वार्तांकन करण्यास जातात. अशा परिस्थितीत त्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्यादृष्टीने येत्या काळात अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहोत. तसेच, राज्य सरकार पत्रकारांच्या बाजूने कायम असून ५० लाखाच्या विमा कवचाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली आहे व ते निर्णयाच्या बाजूने आहेत. त्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
राज्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. तशी बरे होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. पण मृतांची संख्या ही चिंतेची बाब आहे. आज अनेक रुग्ण अखेरच्या क्षणी उपचारासाठी दाखल होतात आणि अशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.