IndiaNewsUpdate : JEE आणि NEET : महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांची पुनर्विचार याचिका

महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांनी जेईई मेन आणि नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रासह प. बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या काँग्रेसशासित राज्यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नीट, जेईई मेन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्टला निर्णय देत नीट-जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी फेटाळून लावली होती. या निकालानंतरही देशात विद्यार्थी-पालकांकडून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ठरविल्यानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीट परीक्षा ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.