MarathwadaNewsUpdate : शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचा मुख्यमंत्र्यांकडे खासदारकीचा राजीनामा

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
बंडू जाधव यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राजीनाम्यामागे त्यांनी राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्यावेळी राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यावेळी पुढच्यावेळी आपल्याला संधी मिळेल असं सांगून आपण शिवसैनिकांना समजावलं. परंतु, आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असून त्यामुळे आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आहे, असं जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
बंडू जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. २००९ ते २०१४ दरम्यान ते परभणीतून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४मध्ये त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५ मते मिळाली होती. केंद्र सरकारच्या स्थायी समिती आणि कृषी मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.