Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध सात मुख्यमंत्र्यांनी उठवला आवाज , सोनिया गांधी यांचा पुढाकार

Spread the love

मोदी  सरकारने घेतलेल्या जाचक निर्णयाच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसह बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्चुअल बैठक आयोजित करून सर्व राज्यांनी एकत्र येण्याचा संकल्प केला. या बैठकीत जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. केंद्र सरकारने आपण नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं सांगणं म्हणजे विश्वासघात आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले. सोनिया गांधींनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं सांगितलं. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी सागितलं की, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित घोषणांमुळे आपल्याला चिंता वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या इतर समस्या आणि परीक्षा यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असून बेजबाबदारपणे हाताळलं जात आहे”.

दरम्यान सर्व राज्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी विनंती यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली. “माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाऊया आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   म्हणाले की, “अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत?”. राज्यातील लॉकडाउन शिथील केला जात असतानाही शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. आपण जवळपास ५०० कोटी खर्च केले आहेत. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जिथे राज्यांची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारने जीएसटी नुकसान भरपाईदेखील दिलेली नाही. आपण एकत्रितपणे पंतप्रधानांना सामोरं गेलं पाहिजे या ममता बॅनर्जींच्या मताशी मी सहमत आहे”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!