न्यायप्रिय लोकांनी प्रश्न भूषण यांच्या मागे उभे राहावे , राजू शेट्टी यांचे जाहीर आवाहन

“प्रशांत भूषण यांच्या भूमिकेमागे मागे सगळ्याच न्यायप्रिय लोकांनी राहिले पाहिजे. त्यांनी आपल्या मनातील प्रश्नांनाच वाचा फोडलेली आहे. म्हणून सज्जनांनो नेभळटपणा सोडा आणि निर्भयपणे प्रशांत भूषण यांच्या पाठीशी निर्भयपणाने उभे रहा.” असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेटटी यांनी रविवारी केले.
शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका विषद केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्याय व्यवस्था व प्रसार माध्यमे ही दोन स्तंभ सातत्याने वादग्रस्त ठरत आहेत. माध्यमापैकी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी तर राज्यकर्त्यांची भाटगीरी करण्यातच धन्यता मानली आहे. पण मला आश्चर्य वाटते ते न्यायव्यवस्थेचे न्यायालय हे आमचा शेवटचा आशेचा किरण होता. त्यावरचाही विश्वास आता डळमळीत झाल्यासारखे वाटू लागले आहे. प्रशांत भूषण यांनी न्यायव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करणारे ट्विट केल्यावर सर्वोच्च न्यायालय खडबडून जागे झाले. भूषण यांनी आठ-नऊ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे बरेचसे न्यायमूर्ती भ्रष्टाचारी आहेत, असे वक्तव्य केल्याची अवमान याचिका प्रलंबित असताना तातडीने सुणावनीसाठी घेतली गेली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती २ सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याच्याआधी या दोन्ही दाव्याचा निकाल लावण्याचा हेतू दिसत आहे. तसा त्यांनी गर्भित इशारा देखील प्रशांत भूषण यांना दिलेला आहे.”
“हे सगळ बघितल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला अस वाटतं की हे न्यायालयाच कामकाज सुरू आहे की ग्रामपंचायतीतला तंटामुक्तीचा न्यायनिवाडा सुरू आहे. ॲटर्नी जनरल यांनी विनंती करून सुध्दा सर्वोच्च न्यायालय प्रशांत भूषण यांना शिक्षा करण्याबाबत पुर्णविचार करायला तयार नाही. मग ही व्यक्तीगत भांडणे आहेत का? न्यायव्यवस्थेच्या त्रुटीबद्दल निर्भयपणे जर कुणी टिप्पणी करून आवाज उठवत असेल तर त्याची सत्यता पडताळून त्या त्रुटी दुर करणं हे न्यायालयाच काम आहे. इथे मात्र न्यायालयाच्या अवमानाच्या नावाखाली नेमकं बोट ठेवणा-याच्या टाळक्यात दंडुका हाणण्याच काम चालू आहे.” असं देखील शेट्टी म्हणाले.
‘मी जरी कायदेपंडीत नसलो तरी कायदे मंडळाचा १५ वर्षे सदस्य राहिलेलो आहे. त्यामुळे हे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार मला आहे असे वाटते. शिक्षा झाली तरी भोगण्यास तयार आहे’ अशी बाणेदार भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतलेली आहे. सगळ्याच न्यायप्रिय नेभळटपणा सोडून निर्भयपणे प्रशांत भूषण यांच्या मागे उभे रहा, असे शेट्टी यांनी पत्रकात आवाहन केले आहे.