Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत साजरा करा , मुख्यमंत्र्यांचे गणेशभक्तांना आवाहन

Spread the love

कोरोनाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रात आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना होत असून  महाराष्ट्राची कोरोनाच्या  विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जनतेला शुभेच्छा देताना श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

यानिमित्ताने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि ,  सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गणेश मंडळांना धन्यवाद

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी नुकतीच चर्चा करून त्यांनाही सुचना दिल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे, त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी  सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचे होईल. शासनाने घालून दिलेले नियम पाळत असल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी या मंडळांना धन्यवाद दिले आहेत.

पुणेकरांना पोलिसांच्या सूचना , सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणेकरांमध्ये दरवर्षी गणेशोत्सवाचा उत्साह मोठा असला तरी यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरीही नागरिकांनी बाहेर पडू नये आणि काही अनुचित प्रकार होऊन नये म्हणून सात हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात राहणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग सध्या आटोक्यात आहे. पण, नागरिक उत्सवासाठी बाहेर पडल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूका निघणार नाहीत. तसेच मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ६० ते ७० टक्के मंडळांनी मंदिरातच गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. ज्या मंडळांना मंदिर नाहीत, त्यांना छोटे मंडळ उभे करण्यास परवानगी दिली आहे. उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी पोलिसांचा बंदोबस्त दरवर्षीप्रमाणेच असणार आहे. या बंदोबस्तात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार आहे.

दरम्यान पहिल्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून बंदोबस्त राहणार आहे. तसेच, घरगुती गणपतीचे सोसायटीत विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी बाहेर पडू नये त्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी, सातशे अधिकारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा समावेश राहणार आहे. शहरात गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत म्हणून गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये १०० कर्मचारी असतील. त्याबरोबरच घातपातविरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचाही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडूनदेखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!