AurangabadCrimeUpdate : संस्थाचालकाच्या लैंगिक अत्याचाराने त्रस्त शिक्षिकेला पतीने धीर दिल्यामुळे दिली पोलिसात तक्रार

अश्लिल फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी
शिक्षीकेवर तीन वर्षे संस्था चालकाचा अत्याचार
आई-वडिलांच्या भेटीसाठी आलेल्या शिक्षीकेला आपल्या पत्नीने भेटायला बोलावल्याची बतावणी करुन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत भोकरदनमधील संस्था चालकाने तिच्यावर तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षीकेने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पतीने धीर दिल्यामुळे सोमवारी शिक्षीकेने सिडको पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी संस्था चालक काकासाहेब शामराव मुरकुटे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील ३१ वर्षीय शिक्षीकेचे आई-वडिल सिडकोतील एन-५ भागात राहतात. त्यांना भेटण्यासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये शिक्षीका आली होती. त्यावेळी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे राहणारा शिक्षण संस्था चालक काकासाहेब मुरकुटे याने पत्नीच्या मोबाईलवरुन शिक्षीकेशी संपर्क साधला. त्याने आपल्या पत्नीने तुला भेटायला बोलावल्याची थाप मारली. शिक्षीका घरी गेली त्यावेळी मुरकुटेची पत्नी तेथे नव्हती. त्याचा गैरफायदा घेत मुरकुटेने तिचे फोटो काढत घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो व व्हिडीओ त्याने तयार केले. त्याआधारे त्याने शिक्षीकेला वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. हा प्रकार सुरू असतानाच त्याने शिक्षीका व तिच्या शिक्षक पतीशी विनाकारण वाद घालून दाम्पत्याला शाळा सोडण्यास सांगितले. त्यानंतर आपणच शाळा सुरू करत असल्याचे म्हणत त्याने भागीदारीसाठी वीस लाखांची मागणी केली. आर्थिक परिस्थिती नसताना देखील शिक्षक दाम्पत्याने त्याला १४ तोळे सोने व नातेवाईकांकडून दहा लाख रुपये घेत पैसे दिले. यावेळी शिक्षीकेच्या पतीला करारनामा करुन देतो असे सांगितले. पुढे जुन-जुलै २०१९ मध्ये त्याने केदारखेडा येथे छत्रपती पब्लिक स्कुल थाटली. त्यानंतर त्याचा आणखीनच त्रास वाढला. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा शिक्षीकेवर लैंगिक अत्याचार केला.
……..
शिक्षक पतीने दिला धीर…..
संस्था चालक मुरकुटेचा त्रास असह््य होत असल्याने अखेर पीडीत शिक्षीकेने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अखेर पीडीत शिक्षीकेने आत्महत्येचा निर्णय घेतला. तेव्हा पतीने तिला विश्वासात घेऊन धीर दिला. त्यानंतर सोमवारी हे शिक्षक दाम्पत्य सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाले. शिक्षीकेच्या तक्रारीवरुन मुरकुटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड करत आहेत.