PoloiticaOfMaharashtra : मोठी बातमी : अजित पवार यांच्यानंतर पार्थ पवार शरद पवारांच्या “सिल्व्हर ओक ” वर….

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अपरीपक्व म्हणून थेट सुनावले होते. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बुधवारी बैठक झाली होती.मात्र याबाबत यांनी मौन बाळगणेच पसंत केले . त्यानंतर आता पार्थ पवार हे थेट शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे चर्चेत आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावरही पार्थ पवार शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पार्थ पवार यांनी पक्षाशी विसंगत भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीत गटतट पडले की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अखेर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करत चर्चेला पूर्ण विराम दिला खरा पण यावरुन कौटुंबिक लढाई होण्याची चीन्हे महारष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसत आहेत. तर भाजपचे परिपक्व नेते या कौटुंबिक कलहाला चांगलीच हवा देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याविषयी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता पार्थ पवार समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढलेल्या आणि निवड समितीत काम केलेल्या युवा नेत्याला अपरीपक्व म्हटल्यामुळे पार्थ नाराज असल्याची माहिती समर्थकांकडून दिली जात आहे.
अजित पवारांन मोठ्या आत्मविश्वासाने पार्थ यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात लाँच केलं होतं. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही राष्ट्रवादीत वादळ निर्माण झालं होतं. विधानसभा निवडणकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. त्यामुळे पार्थ पवार कुठला निर्णय घेतात याकडे आता राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना आता जाहीरपणे फटकारल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार आणि पार्थ हे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार किंवा पार्थ पवार हे नाराज नाहीत असा खुलासा केला आहे.