CoronaMaharashtraUpdate : राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील कोरोनामुळे कालवश, एकाच कुटुंबातील तिसरा मृत्यू

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांचा लहान भाऊ महेश याचा चार दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोन दिवस आधी चुलते अनंतराव पाटील यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानं एकाच कुटुंबातील तिघांना करोनामुळे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये भोसे गावातील राजू बापू पाटील सक्रिय कार्यकर्ते होते.
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात भोसे गावचे पाटील यांची ओळख होती. भोसे गावात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर दहा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पाटील कुटुंबातील १३ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी या तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले राजूबापू पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. काल मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजूबापू पाटील हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. या भागातील उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कृषिराज शुगर या साखर कारखान्याची उभारणी देखील केली होती.
दरम्यान सध्या पंढरपूर तालुक्यात करोनाचा कहर सुरु असून भोसे गावात ६२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. राजूबापू पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच भोसे, करकंब भागात कडकडीत बंद पाळण्यात येत असून भोसे गावाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. राजूबापू पाटील यांचा मृत्यू सोलापुरात झाल्याने त्यांचा मृतदेहावर सोलापुरातच अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.