Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusIndiaUpdate : भारतात दिवसाला ४० हजाराची वाढ , गेल्या २४ तासात आढळले ४७ हजाराहून अधिक रुग्ण

Spread the love

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर कायम आहे. गेल्या  चोवीस तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार १५७ कोरोनाबाधितांमध्ये ४ लाख ९६ हजार ९८८ अॅक्टिव्ह रुग्ण, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेले ९ लाख ५२ हजार ७४४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३३ हजार ४२५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशात मागील दोन दिवसात तब्बल १० लाखांपेक्षा अधिक नमूने तपासणी झाली आहे. यामध्ये २६ जुलै रोजी ५ लाख १५ हजार व २७ जुलै रोजी ५ लाख २८ हजार नमूने तपासण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे. कोरोनाचं संकट दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी आणखी गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पहिल्या दहा देशांच्या तुलनेत भारतात कोरोनारुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. इतकंच नाही तर दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. देशात सातत्यानं ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, देशातील ज्या राज्यात ही संख्या जास्त आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रचंड फटका बसलेल्या अमेरिकेचा रुग्णवाढीचा दर सध्या ४० दिवसांवर गेला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर आहे. मात्र, भारतात १९ दिवसातच रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून भारतात दिवसाला ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, दिवसभरात सर्वाधिक रुग्णांच्या उच्चांकी नोदींपासून भारत केवळ ५ हजारांनी दूर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!