AurangabadCrimeUpdate : शेजाऱ्यांच्या भांडणात विरोधकांच्या बाजूने उभा होता म्हणून खून…

चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात विरोधी गटाकडून उभ्या असल्याचा राग मनात धरून 18 वर्षीय तरुणाला तीन जणांनी रस्त्यावर गाठून पोटात धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास पुंडलीकनगर इथल्या गल्ली क्रमांक 1 मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रितेश प्रभाकर शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर राजू जनार्धन पैठणकर आणि प्रवीण राऊत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत प्रितेशचा ओळखीचा असलेला नंदू शेलार याचे चार दिवसांपूर्वी शेजारील गल्लीमध्ये राहणाऱ्या प्रवीण राऊत व बेबी राऊत यांच्याशी भांडण झाले होते. त्यावेळी प्रितेश हा नंदू शेलार च्या बाजूने उभा होता. हाच राग राऊत यांच्या मनात होता.
या विषयी पोलिसांनी सांगितले कि , रविवारी रात्री 10.45.वाजेच्या सुमारास मृत प्रितेश हा विनोद गायकवाड व सत्यम जाधव या दोन मित्रसह घरी आला व त्याने वडिलांकडून 100 रुपये घेतले व तो बाहेर पडला. तो रस्त्यावर येताच त्याला आरोपी राजू पैठणकर, प्रवीण राऊत आणि त्याची आई बेबी राऊत या तिघांनी अडवलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी राजू ने जवळील धारदार चाकू काढून प्रितेश च्या पोटात भोसकले. जखमी होताच प्रितेश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला.त्यानंतर आरोपी प्रवीण ने दोन्ही हातानी प्रितेश चा गळा दाबला तर त्याची आई बेबी राऊत ही हाता चापटाने मारहाण करीत होती. या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे आणि पथकाने पार पाडली.पुढील कारवाईसाठी अटक आरोपी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे एपीआय घन्नशाम सोनवणे यांना सोपवण्यात आला आहे