Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मोठा मानणारा आणि देवी भवानीचा तर मी मोठा भक्त , व्यंकय्या नायडू यांचे ट्विट

Spread the love

काल राज्यसभेत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा  सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नायडूंवर टीका केली. दरम्यान या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे. रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही, असं ट्वीट वैंकय्या नायडूंनी केलं आहे.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं हे फक्त शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावणारं असल्याने राज्यभरातून या विधानाचा निषेध केला जात आहे. व्यकंय्या नायडू यांच्या विधानामुळे राज्यभरातील पडसाद उमटताना दिसत आहेत.

अमरावतीमध्ये तीव्र निषेध

शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा प्रकारची तुफान घोषाबाजी शिवसैनीकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि शिवप्रेमी यांनी नुकताच झालेल्या राज्यसभेतील खासदारांच्या शपथविधी वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यावर व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अमरावती शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला चपला मारून निषेध केला.

नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक

नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी अशा आशयाचे पत्र पाठवत या घटनेचा निषेध केला. तसेच नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं. तर पुण्यातही संभाजी ब्रिगेडनं आंदोलन सुरू केलं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथविधी नंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जे वक्तव्य केलं हे माझं चेंबर आहे, कुणाचं घर नाही. या विधानावरून राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर सणसणीत टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर ‘तोंड बंद’ आंदोलन सुरू झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही…, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि समर्थकांना जाब विचारला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!