CoronaNewsUpdate : गृह विलगीकरणासाठी केंद्र सरकारच्या या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना कोरोनाच्या सौम्य आणि तीव्र लक्षणांशी संबंधित आहेत. दरम्यान एचआयव्ही आणि कॅन्सरच्या रुगांना कोणत्याही परिस्थितीत ” होम आयसोलेशन”मध्ये ठेवता येणार नाही. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे लागेल. अशा रुग्णांना लक्षणाच्या सुरुवातीपासून १० दिवसांनी डिस्चार्ज दिला जाईल.
आरोग्य विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सौम्य लक्षण आणि लक्षणं दिसून न आलेल्या रुग्ण पण ज्यांना दूसरा कुठलाही आजार नाही तेच रुग्ण फक्त होम आयसोलेशनमध्ये उपचार घेऊ शकतात. पण यासाठीही डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल. होम आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर चाचणीची गरज नाही. लक्षणं दिसून येत नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण होत असेल, छातीत वेदना सुरू झाल्यास किंवा बोलताना त्रास होत असेल तर मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. याशिवाय ६० वर्षांवरील रुग्णांवरही हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागणार आहेत.
दरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसासंबंधी रुग्णांवरही हॉस्पिटलमध्येच उपचार करावे लागतील. होम आयसोलेशनमधील रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्यांपासून पूर्णपणे वेगळे राहावे लागले, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ज्या राज्यांनी होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे, त्यांच्यासाठी या मार्गदर्शक सूचना लागू असतील.