NewMumbaiNewsUpdate : हळदीनंतर ९ व्या दिवशी नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन न करण्याचा इशारा

पनवेलममध्ये नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळदीला आलेल्या तब्बल 90 पाहुण्यांची कोरोना चाचणी घेतण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेली माहिती अशी की, पनवेल मधील नेरे गावात 14 जून रोजी पाटील कुटुंबात मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 23 जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेरे परिसर कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्यात नव्वदपैकी 27 जणांची चाचणी करण्यात आली आहे. उवर्रीत लोकांची चाचणी होणार आहे. दरम्यान 25 जून रोजी पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली.
नवी मुंबई आणि परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नवी मुंबई शहरात 29 तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार असून 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिसांची बैठक घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.