AurangabadNewsUpdate : कोविड केअर सेंटर व विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ऑनलाईन लोकार्पण

राज्यात आरोग्य सुविधा मोठ्याप्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ होतो. शासन आरोग्य सुविधा राज्यभर मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन देत आहे. तरी देखील नागरिकांनी सध्याची कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घ्या. शारिरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून झाले. यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती होती. तसेच मंचावर उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अन्बलगन यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या समन्वयातून भरीव कार्य होत आहे. या आपत्तीकाळात लढण्यासाठी आयुधांची आवश्यकता आहे. ही आयुधे शासन राज्यभरात उपलब्ध करुन देत आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळांची उभारणी राज्यात होते आहे. लवकरच राज्यात शंभरहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा होतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अन्बलगन यांनी केले. या कार्यक्रमास खासदार भागवत कराड, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचीही उपस्थिती होती.