#CoronaVirusEffect : हृदयद्रावक : बेड नाही म्हणून आई गेली , तर आजीचा मृतदेह आठ दिवस पडून होता शौचालयात….

राज्यात आणि देशभरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही चांगल्या बातम्या येत असल्या तरी वाईट बातम्याही मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे एकूण मानवतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जळगावमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोनाचा धुमाकूळ आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य कारभारामुळे एक कुटुंब अक्षरशः उद्धवस्त झालं आहे. यामध्ये हर्षल नेहेते यांना आपली आई आणि आजी तर गमवावी लागली आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , कामानिमित्त पुण्यात राहणाऱ्या हर्षल नेहेते यांची आई आणि आजीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ६ तास वाट पाहूनही आयसीयू बेड न मिळाल्याने ६० र्षीय आईचा मृत्यू झाला, तर ८२ वर्षीय आजीनेही रुग्णालयातच जीव गमावला. मात्र मृत्यू झाल्यानंतर तब्बल ८ दिवस आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात पडून होता. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ ने वृत्त दिले आहे. जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह जिल्हा कोविड रुग्णालयातच स्वच्छतागृहात आढळून आल्याने रुग्णालयातील वार्ड क्रमांक सात मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व वॉर्ड बॉय विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दि. २ जून पासून ८२ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्ध महिला कोरोना वॉर्डमधून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र सदर वृद्ध महिलेचा मृतदेहा हा ८ दिवसानंतर कोव्हिड रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळून आल्याने रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला. विशेष म्हणजे टॉयलेटमधून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ च्या डॉक्टर परिचारिकांसहित सर्व कर्मचाऱ्यांवर या घटनेचा ठपका ठेवत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.