MumbaiNewsUpdate : धक्कादायक : मुंबईत कोरोनाचा कहर , महापालिकेचे अभियंता शिरीष दीक्षित यांच्या मृत्यूने हळहळ …

मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांचे काल रात्री ८ च्या सुमारास माहीम येथील राहत्या घरी अचानक निधन झाल्याचे वृत्त आल्यानंतर एकाच खळबळ उडाली आहे दरम्यान दीक्षित यांचा काल दुपारी करोना रिपोर्ट आला होता. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर रात्री अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आले. विशेष म्हणजे त्यांनी दुपारपर्यंत ड्युटी केली होती . दरम्यान, दीक्षित यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगण्यात येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रमुख अभियंता म्हणून काम करणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे पालिकेच्या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पदाचीही जबाबदारी होती.
महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दीक्षित यांच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल आला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कालपर्यंत पालिकेत रोज कार्यरत असलेले दीक्षित संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास त्यांचं अचानक निधन झालं. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे, मितभाषी व निगर्वी स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने महापालिका प्रशासनाने आपला एक कुशल अभियंता गमावला आहे. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
‘कोरोना कोविड-१९’ च्या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्यातही त्यांचा पुढाकार होता. ‘कोरोना कोविड-१९’ बाबत घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी मनुष्यबळ संख्येचे आव्हान असतानाही त्यांनी समर्थपणे पार पाडली.
मुंबईत कोरोनाचा कहर चालूच , उपचार चालू असताना १७०० जणांचा मृत्यू
मुंबईत १ हजार ३१४ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५० हजार ८५ झाली आहे. मुंबईत आज ६४ रुग्ण दगावल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ७०० झाली आहे. आज दगावलेल्या ६४ रुग्णांपैकी ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आज दगावलेल्यांमध्ये ४४ पुरुष आणि २० स्त्रियांचा समावेश आहे. मृतांपैकी तिघे ४० वर्षांखालील, ३८ जण ६० वर्षांवरील आणि २३ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.
आज १३१४ नवे रुग्ण सापडल्याने करोना रुग्णांची संख्या ५० हजार ८५ झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तर पालिकेच्या अहवालानुसार ही संख्या ४९ हजार ८६३ एवढी आहे. आज मुंबईत ८४२ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २२ हजार ३८ झाली आहे. दरम्यान, आज धारावी आणि दादरमध्ये प्रत्येकी १२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्ण संख्या १ हजार ९२४ तर दादरमधील एकूण रुग्ण संख्या ४२० झाली आहे. माहीममध्ये १४ रुग्ण सापडल्याने या ठिकाणची रुग्ण संख्या ६५१ झाली आहे. ३० मे पासून धारावी, दादर आणि माहीममध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.