MumbaiNewsUpdate : सनदी अधिकाऱ्यांच्या ” यशोधन ” मध्ये २६ जणांना कोरोनाची बाधा…

राज्य सरकारमधील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या चर्चगेट जवळील यशोधन इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एक मजला सील करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता या इमारतीतील आणखी २६ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये कोविड कृती दलातील एका महिला सनदी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , मंत्रालयाजवळील यशोधन इमारतीतील कोरोनाग्रस्तांमध्ये एका महिला सनदी अधिकाऱ्याचा आणि इतर २५ जणांचा समावेश आहे. आयएएस अधिकारी कोविड कृती दलात कार्यरत आहेत. यापूर्वी मंत्रालयातील दोन आयएएस अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. ते अधिकारीही याच यशोधन इमारतीत राहतात. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक ज्येष्ठ अधिकारी यशोधन इमारतीत राहतात. याच इमारतीत करोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. करोनाची लागण झालेल्या २५ जणांमध्ये यशोधन इमारतीतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काम करणारे स्वयंपाकी, घरकामगार आणि वाहनचालकांचा समावेश आहे.
या इमारतीत यापूर्वी करोनाची लागण झालेल्या एका अधिकाऱ्याला त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकरांमुळे लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्य सरकारने या इमारतीत राहणारे सर्व अतिवरिष्ठ अधिकारी आणि इमारतीत काम करायला येणारे स्वयंपाकी, घरकामगार, वाहनचालकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे दीडशे जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणी अहवालात सरकारलाही धक्का बसला आहे. या इमारतीतील २६ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.