MaharashtraUpdate : चर्चेतली बातमी : महाराष्ट्र हातून गेल्याची भाजपची सल जाता जाईना…

महाराष्ट्राची सत्ता हातून गेल्याची भाजपची सल जाता जाईना अशी स्थिती आहे . कधी देवेंद्र फडणवीस कधी चंद्रकांत पाटील तर कधी भाजपचे अन्य नेते या विषयावरची खद -खद सातत्याने बोलून दाखवत आहेत आता देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी “सरकारच्या नावावर सर्कस सुरू असल्याची टीका केली होती. दरम्यान राजनाथ सिंह यांना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ‘जशास तसं’ उत्तर दिलं आहे. ‘रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात,’ असा बोचरा टोला मलिक यांनी हाणला आहे.
सोमवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी जोरदार टीका केली होती. ‘महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलीही दूरदृष्टी नाही,’ अशी टीका त्यांनी केली होती. त्याचबरोबर स्थलांतरीत मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला होता.
दरम्यान राजनाथ सिंह यांनी सरकारवर केलेल्या या टीकेला मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत,’ असा चिमटा मलिक यांनी काढला आहे. कोविड १९ साथीच्या विरोधात राज्य सरकारनं दिलेल्या लढ्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंही (ICMR) कौतुक केलं आहे,’ याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे.