दहावी, बारावीच्या निकालाविषयी वाट पाहत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे….

कोरोनामुळे आगामी शैक्षणिक वर्षाचे काय होणार ? याची सर्वत्र चर्चा असून जूनचा पहिला आठवडा संपला तरीही १० वी आणि १२ वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यातच सोशल मीडियावरून १० वी आणि १२ वीच्या निकालाबाबत विविध तारखा पसरवल्या जात आहेत. यामुळे संभ्रम अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनीच पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान ‘सोशल मीडियावर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या निकालांबाबत देण्यात येत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निकालाबाबत राज्य मंडळाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात येईल,’ असा खुलासा शकुंतला काळे यांनी केला असल्याचे वृत्त ‘लोकसत्ताने’ ने दिले आहे.