MumbaiNewsUpdate : महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर अॅलर्ट , पुढील १२ तास सावधानतेचा इशारा

#WATCH Indian Coast Guard ships aircraft & shore stations continuously relaying warnings about impending adverse weather to merchant vessels & fishermen: Indian Coast Guard (ICG). (01.06.2020) pic.twitter.com/UjUyOjzhxF
— ANI (@ANI) June 2, 2020
महाराष्ट्र आणि मुंबई आधीच कोरोनाने त्रस्त असताना मुंबई शहरावर चक्रीवादळाचे सावट आले असल्याचे वृत्त आहे. या वादळाच्या तडाख्यासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दलासह पालिका यंत्रणाही सज्ज झाली आहे. दुसरीकडे पुढील १२ तासांत निसर्ग चक्रीवादळ रौद्र रूप धारण करण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली असून रेड अॅलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक होत असून या बैठकीत वादळाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान काल गृहमंत्री अमित शहा यांनीही या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
पुढील १२ तासांत हे वादळ रौद्र रूप
भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील १२ तासांत हे वादळ रौद्र रूप धारण करू शकते, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर धोक्याचा इशारा देण्यासाठी लाल बावटे लावले आहेत. वादळादरम्यान ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित झाल्यानंतर तेव्हापासूनच या संपूर्ण किनारपट्टी भागात रेड अॅलर्ड असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
थेट मुंबईला आजवर कधीच चक्रीवादळाचा तडाखा बसलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या स्थितीचा सामना करण्याचे मोठे आव्हान मुंबई पालिकेपुढे असणार आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रातील प्रत्येक बदलांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. पालघर किनारी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य व्हावे म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची दोन पथक येथे तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय मुंबईत ३, ठाण्यात १, रायगडमध्ये २, रत्नागिरीत १ आणि सिंधुदुर्गात १ अशी १० पथके तैनात करण्यात आली असून ६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.