मोदी सरकारच्या लॉकडाऊन ५ वर प्रकाश आंबेडकरांनी दिली हि प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या पाचव्या लॉकडाऊनच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि, 1 जून ते 30 जूनदरम्यान लॉकडाऊन 5 असे सांगताना सरकारकडून या लॉकडाऊनमध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेण्यात आले असून, गरीबांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे कि , पाचवा लॉकडाऊन करताना काही नियम, अटी घालण्यात आल्या तर काही ठिकाणी नियमांना धरून लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. त्यात मॉल, हॉटेल तसेच काही कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय कार्यालये चालू करणार पण गरीब कामगार प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही. कोरोनाच्या काळातही हे सरकार श्रीमंतांची बाजू घेत आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडत आहे, असे चित्र पाचव्या लॉकडाऊनमध्ये दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा जाहीर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.